छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत, महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील 11 आणि तामीळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यातर्फे या मानांकनासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामीळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या या प्रस्तावावर अखेर ‘युनेस्को’ची मोहोर उठली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

या बाबी ठरल्या निर्णायक

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या निकषांची पायरी या किल्ल्यांनी सहज पार केली. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या. यामध्ये वास्तुविशारद डॉ.शिखा जैन आणि पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांचे योगदान मोलाचे ठरले. या सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी ‘युनेस्को’च्या महानिदेशकांची भेट घेऊन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.

या किल्ल्यांचा समावेश

  • रायगड
  • राजगड
  • प्रतापगड
  • पन्हाळा
  • शिवनेरी
  • लोहगड
  • साल्हेर
  • सिंधुदुर्ग
  • सुवर्णदुर्ग
  • विजयदुर्ग
  • खांदेरी
  • जिंजी