
कोलकात्यात विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाही. मेडिकल कॉलेज आणि लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आणखी एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. कोलकात्यातील प्रसिद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(आयआयएम) मध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून हरिदेवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने पीडितेला सुमपदेशन सत्राच्या बहाण्याने मुलांच्या वसतिगृहात बोलावले. यानंतर तिला पिझ्झा आणि कोल्डड्रिंक देण्यात आले. पिझ्झाआणि कोल्डड्रिंकचे सेवन केल्यानंतर पीडिता बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत कुठे वाच्छता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी आरोपीने दिल्याचेही पीडितेने सांगितले.
पिझ्झा आणि कोल्डड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळून पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.