
अरबी समुद्रात मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील साडेपाच हजार मच्छीमार नौकांपैकी सुमारे एक हजार नौकांची नोंदणी मत्स्य व्यवसाय विभागाकडे झालेली नाही. ही धक्कादायक बाब पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत उघडकीस आली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या या गल थान कारभारामुळे संवेदनशील किनारा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्याची सागरी सुरक्षा व्यवस्था रामभरोसे झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील कोर्लई समुद्रकिनारी रविवारी आठवडाभरापूर्वी पाकिस्तानी बोट आढळल्याची माहिती कोस्ट गार्ड मुख्यालयातून रायगड पोलिसांना प्राप्त झाली होती. यानंतर सर्व सुरक्षा व्यवस्था बोटीचा शोध घेण्याच्या कामाला लागली होती. मात्र ही पाकिस्तानी बोट नसल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. त्यानंतर रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जिल्ह्यातील मच्छीमार नौकांची तपासणी सुरू केली. आतापर्यंत पोलिसांनी सुमारे 3,500 मासेमारी नौकांची आतापर्यंत तपासणी केली आहे. यामध्ये 287 नौकांचे मत्स्य व्यवसाय विभागाकडे रजिस्ट्रेशन झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
ही नोंदणी मान्य नाही
रायगड जिल्ह्यात ज्या बोटींची नोंदणी झाली आहे, मात्र त्यांच्या मालकांशी संपर्क होत नाही अशा बोटींची नोंदणी पोलीस मान्य करणार नाही, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिला आहे. पोलिसांनी थेट कारवाईची भूमिका घेतल्यामुळे मच्छीमारांचे धाबे दणाणले आहेत.
… तर त्या बोटींवर कारवाई होणार
जिल्ह्यात आतापर्यंत 5417 मासेमारी बोटींचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. 227 बोटींचे रजिस्ट्रेशन प्रस्ताव सादर करण्यात आले असून विविध स्तरावर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. जर रजिस्ट्रेशन नसलेली बोट समुद्रात मासेमारी करताना आढळल्यास त्या बोटीवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे.