लोकसभेत पराभूत झालेल्या उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेत पुनर्वसन! राष्ट्रपती नियुक्त 4 खासदारांमध्ये वर्णी

राज्यसभेच्या खासदारपदी राष्ट्रपती नियुक्त 4 नावांची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले ज्येष्ठ विधिज्ञ, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेत पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार व शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 12 जुलै रोजी याबाबत अधिसूचना काढली. रविवारी सकाळी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली.

गेल्या वर्षी (2024) झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आता उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेत पुनर्वसन करण्यात आले आहे.