दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी आली आहे. पहाडी आवाज व खलनायक, गँगस्टर, गुंड ते राजकारणी अशा विविधांगी भूमिकांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी भूमिकेने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते व भाजपचे माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे निधन झाले आहे. रविवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबाद येथील राहत्या घरी वयाच्या 83 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला असून सिनेसृष्टी व राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून कोटा श्रीनिवास राव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आपल्या विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणारे दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांचे कलेतील योगदान आणि जवळपास 4 दशकांपासून चित्रपट व नाट्य क्षेत्रात त्यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय राहतील. खलनायक आणि त्यांनी साकारलेल्या असंख्य भूमिका प्रेक्षकांच्या हृदयात कायमच्या कोरल्या जातील. 1999 मध्ये त्यांनी विजयवाडा मतदारसंघातून आमदारकीचा विजय मिळवला आणि जनतेची सेवा केली, असे म्हणत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

कोटा श्रीनिवास राव हे तेलुगु चित्रपटसृष्टीतील मोठे नाव होते 1978 ला प्रदर्शित झालेल्या प्रणम खारीदू या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले होते. त्यानंतर जवळपास 40 वर्षाच्या अभिनय कारकि‍र्दीत त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तेलुगूसह तामिळ, हिंदी आणि देशभरातील विविध भाषांमधील चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 1999 ते 2004 ते आमदारही होते. 2015 मध्ये त्यांचा पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला होता.