तामिळनाडूत मालगाडीत भीषण स्फोट, डिझेलने भरलेले चार डबे आगीच्या भक्षस्थानी

तामिळनाडूमध्ये डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीत भीषण स्फोटाची घटना रविवारी घडली. स्फोटानंतर डिझेलने भरलेले मालगाडीचे चार डबे आगीत भक्षस्थानी गेले. या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही ट्रेन मनालीहून तिरुपतीला चालली होती. यादरम्यान तिरूवल्लूरजवळ ही घटना घडली. स्थानिकांनी अग्नीशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

चार डब्यांमध्ये आगीचा भडका उडाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत तात्काळ अन्य डबे वेगळे केले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर या मार्गावरील अनेक गाड्या रोखण्यात आल्या तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले. यामुळे प्रवाशांनाही काही काळ त्रास सहन करावा लागला. आग विझवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे.

आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. तांत्रिक बिघाड किंवा उष्णतेमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाने अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.