
प्रोफेसरच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने महाविद्यालयातच स्वतःला पेटवून घेतले. ही घटना महाविद्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यात पीडिता 94 टक्के भाजली आहे. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
ओडिशातील बालासोरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॉलेजचा विभागप्रमुख पीडित विद्यार्थिनीकडे वारंवार शरीरसंबंधाची मागणी करत होता. मागणी पूर्ण न केल्यास पीडितेला तिचे भविष्य खराब करण्याची धमकी देत होता. अखेर प्रोफेसरच्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने कॉलेज कँम्पसमध्ये स्वतःला पेटवून घेतले. यात ती 94 टक्के भाजली.
पोलिसांनी कॉलेजचा विभागप्रमुख समीर कुमार साहू विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. उच्च विभागानेही तात्काळ कारवाईचा बडगा उगारत प्रोफेसरला निलंबित केले आहे. साहू बऱ्याच काळापासून पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. याबाबत विद्यार्थिनीने अनेक वेळा महाविद्यालय प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली, मात्र आरोपीविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. अखेर पीडितेने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.