
कर्नाटकमधील घनदाट जंगलातील एका गुहेत रशियन महिला आढळून आली. कर्नाटकमध्ये पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ही रशियन महिला दोन मुलींसह आढळली. पेट्रोलिंग करत असताना या महिलाचा सुगावा लागला. विशेष म्हणजे या रशियन महिलेने गुहेत एक घरही तयार केल्याचे दिसून आले. रशियन महिलेचा व्हिसा 2017 सालीच संपलाय.
रशियन महिलेचे नाव नीना कुटिना असे असून ती 40 वर्षांची आहे. तिला दोन मुली असून एका मुलीचे वय 6, तर दुसऱ्या मुलीचे वय साधारण 4 वर्षे इतके आहे. 9 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान, या तिघांची पोलिसांनी गुहेतून सुटका केली व सुरक्षितपणे गुहेतून खाली आणण्यात आले.
2017 साली नीना गोव्यात आली होती. त्यानंतर ती कर्नाटकमधील गोकर्ण गावात पोहोचली. आध्यात्मिक आयुष्याची ओढ वाटू लागल्याने तिने या गोकर्णमधील घनदाट जंगलात वास्तव्य करण्यास सुरुवात केली. महिला आणि तिच्या मुलांनी जंगलात काय खाल्ले, इतके दिवस कसे राहिले? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
शोध कसा लागला?
गोकर्ण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीधर एसआर आणि त्यांची एक टीम पर्यटक सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी रामतीर्थ डोंगरावर गस्त घालत होते. या वेळी सर्च ऑपरेशनदरम्यान त्यांना एका नैसर्गिक तयार झालेल्या या गुहेत नीना दोन मुलांसह राहत असल्याचे आढळले. पोलीस दाखल होताच सुरुवातीला नीनाने कुठलीही ओळख दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर महिला बालकल्याण विभागातील एका महिलेला बोलावून नीनाकडून माहिती घेण्यात आली. तिने पासपोर्ट हरवल्याचे पोलिसांना सांगितले, परंतु पोलिसांनी शोधाशोध केल्यास त्यांना नीनाचा पासपोर्टसह इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. या वेळी नीनाचा व्हिसा 2017 रोजीच संपल्याचे दिसून आले. दरम्यान आता या महिलेची सखोल चौकशी केली जात आहे. तिला परत रशियात पाठवण्यासाठी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.