
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कलिना विधानसभेतील दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते कलिना-वाकोला विभागात पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची शिष्यवृत्ती, प्रशस्तिपत्र, ट्रॉफी आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सांताक्रुझ पूर्वमधील वाकोला येथील पाठक टेक्निकल स्पूल येथे हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोतनीस यांनी त्यांच्या मार्मिक शैलीत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकीर्दीसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना संत यांनी केले. यावेळी शिवसेना कलिना विधानसभाप्रमुख शोभन तेंडोलकर, विधानसभा संघटक सगुण नाईक, सुधीर खातू, माजी नगरसेवक दिनेश कुबल, महिला विधानसभा संघटक हर्षदा परब, उपविभाग संघटक साधना डाळ, गीता मोरे तसेच शाखाप्रमुख, शाखा संघटक व पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलिना-वाकोला विभागातून प्रथम क्रमांक श्रीनिधी देवाडिगा (98.60 टक्के), द्वितीय क्रमांक मेहक जवानी (98.20 टक्के), तृतीय क्रमांक मयूरेश पवार (97.60 टक्के) आणि जैनिल डेडिया यांची निवड करण्यात आली. कलिना विधानसभेतून शाखानिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली तसेच संपूर्ण विधानसभा क्षेत्रातून उत्पृष्ट गुण मिळवलेल्या सुमारे 600 विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांनासुद्धा व्यासपीठावर बोलावून सत्कार करण्यात आला.