
1974 साली तत्कालीन सरकारने मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात राज्यभर रान पेटल्यानंतर सरकारने निर्णय मागे घेतला. आता तब्बल 50 वर्षांनंतर मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला असल्याने सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. ‘लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींच्या पतीला, पित्याला आणि भावाला बेवडा करण्याचा चंग बांधला असून सत्ताधुंद सरकार साधुसंतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
पन्नास वर्षांपूर्वी मद्यविक्रीचे परवाने बंद करण्यात आले होते. पण आता पुन्हा ते खुले करून तथाकथित ‘लोकहिताचे निर्णय’ घेणाऱ्या सरकारच्या विरोधात कुणी बोलू नये, यासाठी महाराष्ट्रातील जनतेने शुद्धीत राहूच नये, याची तजवीज हे सरकार करीत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. आव्हाड यांनी 47 कंपन्यांची यादीच आज वाचून दाखवली. याप्रकरणी आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत फडणवीस सरकारवर निशाणा साधला. दरम्यान 240 सदस्यांच्या पाशवी बहुमताने जर सरकारच्या डोळ्यांवर झिंग चढली असेल तर या झिंगेमुळे बंद झालेले डोळे जनताच उघडेल, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.