
धुळ्याच्या गुलमोहर शासकीय निवासस्थानी दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या बेकायदेशीर कोट्यवधींच्या कॅशबाबत आता खुद्द पालकमंत्र्यांनी कबुली दिली आहे. गुलमोहर हॉटेलमध्ये कोट्यवधींची कॅश मिळाल्यामुळेच आपण त्या ठिकाणी गेलो नाही, असे पालकमंत्री म्हणाले. त्यामुळे पालकमंत्री 55 दिवस तुम्ही गप्प का राहिले, कोणती ‘सेटेलमेंट’ करायची होती, असे सवाल शिवसेना नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केले आहेत.
माजी आमदार गोटे यांनी या कॅशबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या अंदाज समितीला लाच देण्यासाठी एकूण पंधरा कोटींचा सौदा झाल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. या घोटाळ्यातील 1 कोटी 84 लाख 84 हजारांची लाच आणली होती, असा आरोपही गोटे यांनी केला आहे. उपस्थित आमदारांना धुळे जिह्यासाठी 20 लाख आणि नंदुरबार जिह्यासाठी 20 दिल्यानंतर शिल्लक रकमेचा ‘गोलमाल’ केल्याचा आरोपही गोटे यांनी केला आहे.
आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना सहआरोपी करा!
धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कॅश प्रकरणात आरोपीला मदत करणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याचे निर्देश न्यायालयाने देऊनही आरोपीला नेमके कोण पाठीशी आहे, असा सवालही गोटे यांनी केला. प्रशासकीय वरदहस्तामुळेच ‘दखलपात्र’ गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई झाल्याचे ते म्हणाले.
या प्रश्नांची उत्तरे द्या!
- गुलमोहर घटनेनंतर 55 दिवसांनी पालकमंत्र्यांनी थोबाड का उघडले?
- 54 दिवस अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश नक्की कुणी दिले होते?
- सरकारी वकिलांनी आरोपीला मदत करावी, असे आदेश नेमके कुणी दिले?