
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या (दि. 18) अक्कलकोट बंदचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गायकवाड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला भाजपा प्रदेश युवा मोर्चाचा अध्यक्ष दीपक काटे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्या सत्कारासाठी आलेले संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर दीपक काटे व त्यांच्या साथीदारांनी वंगणतेल टाकून मारहाण केली होती. याप्रकरणी दीपक काटेसह दोघांना पोलिसांनी अटक केली होती. यातील पाच आरोपी अद्याप पसार होते. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 18) अक्कलकोट बंदची हाक दिली आहे. या बंदच्या यशस्वीतेसाठी जिल्हय़ातील पदाधिकारी व नेतेमंडळी अक्कलकोट येथे येणार आहेत. या बंदला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान, गायकवाड यांच्या हल्ल्याप्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असलेला दीपक काटे याला अक्कलकोट येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि दररोज पोलीस स्टेशनला हजेरी लावणे यासह विविध अटींवर जामीन मंजूर केला आहे.