
शिरूर – पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या कुकडी नदीवरील टाकळी हाजी येथील जगप्रसिद्ध कुंड अर्थात रांजणखळग्यांवरील 2011 साली बांधण्यात आलेला झुलता पूल दुरुस्तीच्या कारणास्तव अखेर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. हा झुलता पूल धोकादायक अवस्थेत असल्याने स्थानिक ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत होते. या महत्वपूर्ण प्रश्नी संबंधित विभागाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. यानंतर शनिवार 19 जुलै रोजी पूल रहदारीसाठी बंद करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे संभाव्य धोका टळला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या धोकादायक असलेल्या झुलत्या पुलाबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना पूल बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शिरूर शाखा अभियंता अनिल गावडे, टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे, माजी उपसरपंच गोविंद गावडे, कर्मचारी सागर घोडे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा झुलता पूल बंद करण्यात आला.
या झुलत्या पुलावरून केवळ 20 लोकांची ये-जा करण्याची क्षमता असताना पर्यटन हंगामात यावर 100 हून अधिक लोकांची गर्दी होत असे. त्यामुळे पूल डळमळीत होऊन दुर्घटनेचा मोठा धोका निर्माण झाला होता. पूल बंद करण्यात आल्यामुळे अपघाताचे सावट दूर झाले असून भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही महत्त्वाची पावले असल्याचे स्थानिक नागरिक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामसभेत पारित ठरावानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पूल दुरुस्ती व नवीन आरसीसी पूल उभारणीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.हा झुलता पूल पूल पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत पर्यटकांना ये जा करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे टाकळी हाजीचे सरपंच अरुणा घोडे यांनी सांगितले.































































