
लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे जगदीश गायकवाड यांच्या शेतामध्ये मागील काही दिवसापासून नर आणि मादी अशी दोन वानरे वास्तवास होते. त्यापैकी नर वानर राजाचा 22 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. मृत्यूचे कारण समजले नाही. ग्रामस्थांनी एकञ येऊन त्याचा अंत्यविधी केला. हिंदू धर्मामध्ये वानरांना पवित्र मानले जाते. हिंदू धर्मामध्ये वानरांना हनुमानाचा अवतार म्हणून गणना केली जाते. त्यामुळे ग्रामस्थांकडून वानर राजाचा मृत्यू झाल्याचे कळताच गावातील तरुण वयोवृद्ध हनुमान भक्तांनी एकत्र येत वानर राजाची अंत्ययात्रा काढण्याचे ठरवले.
गावातील तरुणांनी व भजनी मंडळ यांनी एकत्रित येत ट्रॅक्टरमधून वानर राजाची टाळ, मृदंग, विना व खांद्यावर पताका घेत राम नामाचा जप करत तांदूळजा नगरीत फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर हनुमान मंदिर परिसरामध्ये वानर राजाला स्नान वगैरे घालत भगवा पंचा, हार, पुष्पगुच्छ अर्पण करत विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने या वानर राजाचा 4 ऑगस्ट रोजी गोड जेवणाच्या कार्यक्रमानिमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी गावकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान देखील करण्यात आले.