आत्महत्या नाही, सरकारी अनास्थेने केलेला खून; अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील हर्षल पाटील या 35 वर्षीय कंत्राटदाराला जल जीवन मिशनचे काम करूनही 1.40 कोटींचे बिल वर्षभरापासून निधीअभावी मिळाले नाही. उसनवारी करून कामासाठी जमवलेली रक्कम फेडणे कठीण झाल्याने त्याने मृत्यूला कवटाळले. भाजपने ज्या योजनांच्या नावावर मते मागितली, त्याच योजना आता लोकांच्या जीवावर उठल्या आहेत. जर योजनेला पैसे देता येत नसतील तर असल्या योजना काय कामाच्या. ही आत्महत्या नव्हे, तर केंद्र व राज्य सरकारच्या अनास्थेने केलेला खून आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

आता किमान त्याची बिले अदा करून त्याच्या परिवाराची ससेहोलपट होणार नाही हे तरी पाहावे आणि थोडी तरी माणुसकी दाखवावी. कंत्राटदारांनीही असले टोकाचे पाऊल उचलू नये, असे माझे आवाहन आहे, असेही अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

सुप्रिया सुळे यांचे ट्विट

जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे बिल शासनाकडे थकल्यामुळे सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या तरुणाने अखेर आत्महत्या केली. शेतकरी, शिक्षक यांच्यानंतर आता व्यावसायिक देखील या शासनाच्या धोरणामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही मोठी संतापजनक गोष्ट आहे.या सरकारने संपन्न असणाऱ्या राज्याची अक्षरशः दुर्दशा केली. समाजातील सर्व घटकांत एक प्रकारची हताशा निर्माण झाली आहे. स्व. हर्षल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. माझी शासनाला नम्र विनंती आहे की कृपया शासनाची कामे केलेल्या सुशिक्षित तरुणांनी अक्षरशः कर्ज काढून आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने आपली कामे केली आहेत. व्यावसायिकांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी कोर्टात जाण्याची वेळ येते ही महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. त्यांची देयके तातडीने चुकती करण्याच्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले.