ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) योजनेतील कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (ईडीएलआय) च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किमान 50 हजार रुपयांचा विमा मिळेल. मग कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात पैसे असो वा नसो. नोकरीत 60 दिवसांचा खंड पडला तरीही सातत्य मानले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवे नियम कोणते?

यापूर्वी ईडीएलआय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात किमान 50,000 रुपये असणे आवश्यक होते. आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे नसले तरी त्याच्या कुटुंबाला 50,000 रुपये विम्याची रक्कम मिळेल. तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग 12 महिने नोकरी केली असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल.

नव्या नियमानुसार, जर एखादा कर्मचारी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीला लागला आणि दोन नोकऱ्यांमधील अंतर 60 दिवसांपेक्षा कमी असेल, तर त्याला सातत्यपूर्ण सेवेचा लाभ मिळेल. याचा अर्थ, दोन नोकऱ्यांमधील कमी कालावधीचा खंड असला तरीही कर्मचारी ईडीएलआय योजनेच्या विम्याच्या लाभासाठी पात्र ठरेल.

जर कर्मचाऱ्याचा मृत्यू त्याच्या शेवटच्या पगारातून पीएफ कपात झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत झाला, तर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल. ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळातच मृत्यू झाला, त्या कर्मचाऱ्यांसाठी हा बदल महत्त्वाचा आहे.