
>> आकाश गायकवाड
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्थापनेला ४२ वर्षे पूर्ण होत असतानाच महापालिकेच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणा दिवस सोमवारी उजाडला. महापालिकेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच दिवशी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. जल व मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता रवींद्र अहिरे, घनकचरा विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर आणि प्रभारी स्वच्छता अधिकारी सुदर्शन जाधव यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या ताज्या कारवाईनंतर आतापर्यंत लाच घेताना पकडलेल्या केडीएमसीमधील अधिकाऱ्यांची संख्या ४७ वर पोहोचली असून, ही संख्या लवकरच ‘अर्धशतक’ गाठण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे लाचखोरांच्या यादीत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य स्वच्छता अधिकारी, उपअभियंता, प्रभाग अधिकारी, लिपिक आणि कनिष्ठ कर्मचारी अशा सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
महापालिकेतील ‘दिग्गज’ लाचखोर
या काळात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लाचखोरीच्या प्रकरणात पर्दाफाश झाला. १३ जुलै २०१८ रोजी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. त्यांच्यासोबत दोन इतर कर्मचाऱ्यांनाही अटक झाली होती. कालांतराने ते महापालिकेत रुजू होऊन नंतर सेवानिवृत्त झाले. त्यानंतर कार्यकारी अभियंता सुनील जोशी आणि सहाय्यक आयुक्त गणेश बोराडे या दोघांनादेखील दोन वेळा लाच घेताना पकडण्यात आले. आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे नंतर पुन्हा ते महत्त्वाच्या पदांवर नियुक्त होऊन निवृत्त झाले. उपायुक्त सुरेश पवार हेसुद्धा लाचखोरीच्या आरोपानंतर सेवेत राहून निवृत्त झाले.
1995 पासून सुरू झालेली लाचखोरीची मालिका
कल्याण महापालिका 1 ऑक्टोबर 1983 रोजी स्थापन झाली. पहिल्या 12 वर्षांत प्रशासकीय राजवट होती. 1995 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 1996 साली याचे ‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिका’ असे नामकरण करण्यात आले. लाचखोरीची बिजे या प्रशासकीय काळातच रोवली गेली. महापालिकेतील पहिला लाचखोर अधिकारी म्हणून अनधिकृत बांधकाम विभागातील सुपरवायझर तुकाराम संख्ये याला एप्रिल 1995 मध्ये 1500 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. त्यानंतर लाचखोरीच्या मालिकेलाच सुरुवात झाली आणि 2025 पर्यंत हा आकडा तब्बल 47 वर पोहोचला आहे.