
संघनिवडीबाबत गिल आणि गंभीर यांच्यात बिनसल्याची चर्चा होती, पण कसोटी अनिर्णित राखून हिंदुस्थानने टाळलेला पराभव विजयापेक्षा किंचितही कमी नाही. त्यामुळे मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखल्यानंतर हिंदुस्थानी संघाच्या चेहऱयावर आनंदाची आणि समाधानाची लकेर उमटली होती. कसोटीत गिलकडून काही निर्णय चुकीचे घेण्यात आल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत असताना प्रशिक्षक गौतम गंभीर मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. एवढे नव्हे तर, गिलवर टीका करणाऱ्यांना क्रिकेटचे पूर्ण ज्ञान नसल्याचेही खडे बोल सुनावले आहेत.
चौथ्या कसोटीत गिलच्या चुकीच्या धोरणांमुळे इंग्लंडला 669 धावांचा डोंगर उभारता आला होता. त्यामुळे टीकाकारांनी गिलच्या नेतृत्वक्षमता आणि मानसिकतेबाबत प्रश्न निर्माण केले होते. मात्र गंभीर यांनी गिलची पाठराखण करताना, त्याच्यात नेतृत्वाची अपार क्षमता ठासून भरलीय आणि त्याने ते वारंवार सिद्धही केलेय, असे सांगितले. कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर म्हणाले, गिलच्या प्रतिभेवर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जी लोपं त्याच्या खेळाबाबत प्रश्न विचारत आहेत, टीका करत आहेत त्यांना क्रिकेटचे योग्य ज्ञानच नाहीय.