Nanded news – गजबजलेल्या रेल्वे स्थानक परिसरातून तरुणीला फरफटत नेलं, दुचाकीवर बसवून अपहरण केलं; दोघांना अटक

नांदेडच्या गजबजलेल्या रेल्वे स्थानक परिसरातून भर दिवसा दोन तरुणांनी एका तरुणीचे अपहरण केल्याचा प्रकार घडला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवत दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. सदर मुलीचीही त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. पीडित तरुणी सध्या नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात असून तिचा जबाब नोंदविण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे रेल्वे स्थानक परिसर गजबजलेला असताना एकही माणूस मुलीला वाचविण्यासाठी पुढे आला नाही. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी रेल्वे स्थानकावर नेहमीची गजबज सुरू असताना दोन तरुणांनी दुचाकीवर येऊन एका तरुणीला पकडले. आरोपीच्या तिच्या मागावरच होते आणि सदर मुलगी त्यांना गुंगारा देऊन रेल्वे स्थानक परिसरात आली होती. मात्र गजबजलेला परिसर असतानाही आरोपींनी मुलीला मारहाण करून जबरदस्तीने गाडीवर बसवून नेले. हा प्रकार 20 ते 25 मिनिटे सुरू होता, मात्र उपस्थितांनी फक्त बघ्याचीच भूमिका घेतली. एका व्यक्तीने धाडस करून या प्रकरणाचा व्हिडीओ गुपचूप काढला आणि थेट पोलीस अधीक्षकांना पाठवला.

पोलीस अधीक्षकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सायबर तंत्र आणि गोपनिय माहितीचा आधार घेऊन वजिराबाद, भाग्यनगर, इतवारा या पोलीस ठाण्यांना सतर्क केले.पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातले. त्यानुसार रात्रभर पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला. अखेर गुरुवारी सकाळी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याचे नाव महंमद खाजा महंमद अयान असे असून तो इकबालनगर येथील रहिवाशी आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली आहे.

सदर आरोपी तरुणीचे ओळखीचे होते का? अपहरणामध्ये त्यांचा हेतू काय होता? याचा तपास पोलीस करत असून पोलिसांनी महंमद खाजा महंमद अयान याची दुचाकी (क्र.एमएच- 26 -बी-0928) गाडीही ताब्यात घेतली आहे. तसेच अटकेनंतर आरोपींची शहरातून धिंडही काढण्यात आली.