
स्विस बँकांमध्ये हिंदुस्थानींचे किती पैसे आहेत, असा सवाल नेहमीच चर्चेला येतो. स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 37 हजार 600 कोटी रुपयांवर पोहोचला. संसदेच्या अधिवेशनात यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. या मुद्द्यावर अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत स्पष्टीकरण दिले. स्विस नॅशनल बँकेच्या आकडेवारीवरून 2024 या वर्षी स्विस बँकेत हिंदुस्थानींचे पैसे तिपटीने वाढल्याचे सरकारने सांगितले. मात्र या आकडेवारीचा उपयोग स्विस बँकेत हिंदुस्थानींचा काळा पैसा किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी करू नये, असेही सरकारने सांगितले.
स्विस बँकेतील हिंदुस्थानींचा पैसा किंवा परत आणलेला काळा पैसा यावर उत्तर प्रदेशातील सपाचे खासदार जावेद अली खान यांनी प्रश्न विचारला. त्या प्रश्नांना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले आहे. या वेळी त्यांनी संबंधित आकडेवारीही सादर केली. स्विस बँकेतील पैशांबाबत बोलताना पंकज चौधरी म्हणाले की, 2024मध्ये एसएनबीमधील हिंदुस्थानींचा पैसा वाढून 37600 कोटी रुपये इतका झाला आहे. स्विस अधिकाऱ्यांनुसार एसएनबी आकडेवारीच्या संदर्भात डेटामध्ये इतर गोष्टींबरोबरच ग्राहकांच्या ठेवींबद्दल आणि इतर देणी तसंच बँकांना देय रक्कम समाविष्ट आहे. डेटामध्ये ग्राहकांच्या ठेवी, इतर देणी, वेगवेगळ्या बँकांकडे देणी असलेली रक्कम आणि परदेशी शाखांमध्ये ठेवींचा समावेश आहे.
किती पैसा परत आला
केंद्र सरकारने म्हटले आहे की, 2015मध्ये काळा पैसा कायदा लागू झाल्यानंतर 3 महिन्यांच्या कालावधी दरम्यान 4 हजार 164 कोटी रुपयांच्या अघोषित परदेशी मालमत्ता उघड झाल्या. त्यावर 2 हजार 476 कोटी रुपयांचा कर आणि दंड वसूल करण्यात आला. 31 मार्च 2025पर्यंत या कायद्या अंतर्गत 1,021 कर निर्धारण पूर्ण झाले. यामध्ये 35 हजार 105 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर आणि दंड आकारण्यात आला. या प्रकरणांमध्ये एकूण 163 फिर्यादी तक्रारी दाखल करण्यात आल्या. तसंच कर, दंड किंवा व्याज म्हणून 338 कोटी रुपये आधीच वसूल करण्यात आले आहेत.