प्रसिध-सिराजने बॅझबॉलच्या वादळाला रोखले, 3 बाद 175 वरून इंग्लंड सर्वबाद 247; दिवसभरात उभय संघाचे 15 फलंदाज गारद

इंग्लंडच्या बॅझबॉलचे वादळ असे घोंगावले की यजमान दुसऱ्याच दिवशी कसोटीला आपल्या मुठीत करतात की काय अशी भीती वाटू लागली. पहिल्या दिवशी पावसात भिजलेल्या ओव्हलचे दुसऱ्या दिवशी आकाश बदलले होते आणि त्यात इंग्लंडची सलामीची फटकेबाजी जोरात होती. कसोटी एकतर्फी होतेय, असा आवाज घुमू लागला होता. कसोटीत 33 षटकांत 3 बाद 175 अशा फटकेबाजीनंतर इंग्लंड मालिका विजयाचा पाया रचतोय, असे चित्र उभे राहिले होते. पण अचानक ओव्हलच्या खेळपट्टीने सरडय़ासारखा रंग बदलला. बलशाली वाटणार्या इंग्लिश फलंदाजीला मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने असा ब्रेक लावला की त्यांचे पाच फलंदाज धडाधड बाद झाले आणि पावसाच्या व्यत्ययामुळे थांबलेल्या सामन्यात  थंडावलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडचा डाव आश्चर्यकारकरीत्या 247 धावांवर आटपला. मोठी आघाडी घेण्याचे स्वपभंग झालेला यजमान फक्त 23 धावांचीच आघाडी घेऊ शकला. दुसऱ्या दिवसाचा शेवटही नाटय़मय झाला. हिंदुस्थानी डावाला यशस्वीने जैसबॉलरूपी सुरुवात दिली. पण राहुल आणि सुदर्शनरूपी दोन धक्के हिंदुस्थानी डावाला बसल्यामुळे दिवसअखेर 2 बाद 75 अशी स्थिती होती. खेळ थांबला तेव्हा जैसवाल 51 तर नाईट वॉचमन आकाश दीप 4 धावांवर खेळत होता.

गुरुवारीच हिंदुस्थानची फलंदाजी ढेपाळली होती. आज चार फलंदाज अवघ्या सहा धावांत बाद करत इंग्लंडच्या गस अॅटकिन्सनने धडपडत दोनशे गाठणाऱ्या हिंदुस्थानचा पहिला डाव 224 धावांवर संपवला. गुरुवारची नाबाद जोडी करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर सहा चेंडूंत बाद झाली आणि हिंदुस्थानचा खेळ खल्लास झाला. गुरुवारी 6 बाद 204 अशी धावसंख्या उभारणाऱ्या हिंदुस्थानने आज सर्वांची घोर निराशा केली. नायर आणि सुंदर दोघेही लवकर बाद झाले आणि पुढे मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा एकाच षटकांत शून्यावर बाद झाले.

सिराजची कमाल, प्रसिधची धमाल

इंग्लंडचा वेगवान खेळ पाहून हिंदुस्थानी गोलंदाज बिथरले होते. कुणाला काहीएक कळत नव्हते. तेव्हाच सिराजने रुटला पायचीत केले. रुटचा धक्का इंग्लंडला मुळापासून हादरवणारा ठरला. त्यानंतर इंग्लिश डावाला कोणताही टेकू सावरू शकला नाही. हॅरी ब्रूक एका बाजूला उभा राहिला, पण दुसरीकडे कुणीही त्याची साथ दिली नाही. मग सिराजने जेकब बेथेललाही पायचीत करत इंग्लडचे पंबरडे मोडले. त्यानंतर प्रसिधने एकाच षटकातील पाच चेंडूंत दोन जॅमींना मैदानावरून कमी करत इंग्लंडला ट्रकवरून बाजूला ढकलले. पुढे गस अॅटकिन्सनचाही अडथळा दूर करत इंग्लंडला शेवटावर आणले. त्यातच पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि खेळ थांबवला. पण जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा सिराजने हॅरी ब्रूकचा त्रिफळा उडवत इंग्लंडच्या डावावर पूर्णविराम लावला. आज ख्रिस व्होक्स मैदानात उतरलाच नाही आणि इंग्लंडचा डाव 23 धावांची आघाडी घेत 247 धावांवर संपला. सिराज आणि प्रसिधने प्रत्येकी चार विकेट टिपत ओल्या ओव्हलवर कमाल केली.

इंग्लंडचा सुस्साट खेळ

ओव्हलवर ओल्या झालेल्या खेळपट्टीवर हिंदुस्थानी फलंदाजांना काही सूर गवसला नाही, मात्र त्याच खेळपट्टीवर यजमानांच्या सलामीवीरांना बॅझबॉलची कमाल दाखवली. बेन डकेट आणि झॅक क्रावलीने टी-20 क्रिकेटला साजेशी फलंदाजी करताना हिंदुस्थानी वेगवान त्रिकुटाला कुट-कुट कुटले. सिराज असो किंवा आकाश दीप, त्यांनी कुणालाच जुमानले नाही. 13 षटकांत 92 धावा लागल्या असताना डकेट बाद झाला आणि ही जोडी फुटली. दुसरीकडे झॅकनेही झकास खेळ करताना 14 चौकारांसह 64 धावांचा पाऊस पाडला. तो बाद झाल्यावर कर्णधार ऑली पोपही थांबला नाही आणि ज्यो रुटनेही फटकेबाजी सुरू ठेवत  मोठी आघाडी घेण्याचा दिशेने आगेकूच केली होती, पण सिराजने रुटला पायचीत केले आणि सारा खेळच बदलला.

जैसवालची वेगवान सुरुवात

गेले अनेक डाव अयशस्वी खेळी करणाऱ्या जैसवालने आज इंग्लंडच्या बॅझबॉलला आपले जैसबॉलचा दणका दिला. आजही तो राहुलबरोबर दमदार सलामी देऊ शकला नाही. मात्र त्याने आपल्या बॅटचे उग्र रूप इंग्लिश फलंदाजांना दाखवले. राहुलपाठोपाठ सुदर्शनही लवकर बाद झाला. पण जैसवालने 49 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 51 धावा ठोकल्या. दिवसअखेर हिंदुस्थानने 2 विकेट गमावल्या असल्या तरी 75 धावा करत आपली आघाडी 52 धावांपर्यंत वाढवली.

दिवसभरात 15 विकेट

आज फटकेबाजी बरोबर विकेटही जोरात पडल्या. हिंदुस्थानचे शेवटचे चार फलंदाज केवळ 20 धावा करून आटपले तर इंग्लंडचे 9 फलंदाज 247 धावांत तंबूत परतले. त्यानंतर हिंदुस्थानचा दुसरा डाव पुन्हा सुरू झाला आणि 18 षटकांच्या खेळात 2 विकेटही गमावल्या. अशा पद्धतीने उभय संघांचे 15 फलंदाज 342 धावांत गारद झाले.