
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकला आहे. ‘नाळ 2’ हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला आहे, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार ‘आत्मपॅम्फलेट’ या चित्रपटासाठी आशीष भेंडे यांना जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ला मिळाला. ‘नाळ 2’ या चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप तर ‘जिप्सी’ या चित्रपटासाठी कबीर खंदारे सर्वोत्कृष्ट बाल कलाकार ठरले. ‘बारावी फेल’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. सर्वोत्पृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘जवान’साठी शाहरुख खान आणि ‘बारावी फेल’साठी विक्रांत मेस्सी यांना विभागून देण्यात येणार आहे तर ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी राणी मुखर्जी सर्वोत्पृष्ट अभिनेत्री ठरली.
- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार घोषित केले. या पुरस्कारांसाठी नॉन फिचर श्रेणीत 115 तर फिचर फिल्म श्रेणीत 332 चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या.
- नॉन फिचर श्रेणीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘फ्लॉवरिंग मॅन’ या हिंदी चित्रपटाला मिळाला. ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ हा पॉप्युलर चित्रपट तर सर्वोत्कृष्ट ऑनिमेशनपटाचा मान तेलुगू भाषेतील ‘हनु-मॅन’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.
…आणि विजेते आहेत
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – कथल, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – केरला स्टोरी – सुदीप्तो सेन, सहाय्यक अभिनेता – विजयराघवन (पूक्कलम) आणि मुथुपेटाई सोमू भास्कर (पार्ंकग), सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी (उल्लोझुक्पू) आणि जानकी बोडीवाला (वश), सिनेमॅटोग्राफी – प्रशांतनु महापात्रा (द केरला स्टोरी), सर्वोत्कृष्ट गायक – पीयूएन रोहित (बेबी), सर्वोत्कृष्ट गायिका – शिल्पा राव (जवान), संवाद लेखक – दीपक किंगराणी, सिर्फ एक बंदा काफी है, मेकअप आर्टिस्ट – श्रीकांत देसाई (सॅम बहादूर), वेशभूषा – सचिन लोवळेकर, दिव्या आणि निधी गंभीर ( सॅम बहादूर), संगीत दिग्दर्शन – वाथी (तमिळ), नृत्यदिग्दर्शन – वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहानी).