
गेले चार दिवस पावसाने दिलेली उघडीप, विविध धरणांतून पूर्णतः बंद झालेला विसर्ग, यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेचा पूर झपाटय़ाने ओसरत आहे. पूर ओसरू लागल्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने आज सकाळपासून श्री दत्त मंदिर दर्शनसाठी खुले झाले.
गेल्या आठ दिवसांपासून श्री दत्त मंदिराला कृष्णेच्या पाण्याचा वेढा होता. त्यामुळे संपूर्ण मंदिर पुराच्या पाण्याखाली होते. या मोसमात 25 जून, 4 जुलै व 27 जुलै, असा तब्बल तीनवेळा नृसिंहवाडी मंदिरात पाणी येऊन चढता दक्षिणद्वार सोहळा झाला होता. पहाटे चार वाजता कृष्णेचे पाणी दत्त मंदिरातील ‘श्रीं’च्या पादुकावरून ओसरले. यामुळे आज दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दुपारपर्यंत मंदिरासमोरील पाण्यातूनच दर्शन घेतले. पादुकांवरील पाणी ओसरल्याने आज दुपारची महापूजा, दुग्धाभिषेक पादुकांवर करण्यात आली. आज शनिवार व श्रावण महिना असल्याने श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे देवस्थान समितीने कृष्णेचे पाणी जसे ओसरेल, तसे पाण्याच्या फवाऱ्याने साफसफाई, स्वच्छता करून घेतली. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले.