परराष्ट्र मंत्रालयाच्या बॅगेआड गांजाची तस्करी, 14 कोटी 73 लाख रुपये किमतीचा माल जप्त

परराष्ट्र मंत्रालयाच्या वापरल्या जाणाऱ्या बॅगेआड हायड्रोपोनिक गांजाची तस्करीचा सीमा शुल्क विभागाने पर्दाफाश केला. सीमा शुल्क विभागाने कारवाई करून 14 कोटी 73 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. गांजा तस्करी प्रकरणी एकाला सीमा शुल्क विभागाने अटक केली.

गेल्या काही दिवसांपासून बँकॉकहून हायड्रोनिक गांजा आणण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. तेथील तस्कर हे विविध क्लृप्त्या करून कॅरिअरच्या माध्यमातून गांजा मुंबईत आणू पाहत आहेत. गांजा तस्करीसाठी अशीच एक क्लृप्ती तेथील तस्कराने केली. तो तस्करीचा डाव सीमा शुल्क विभागाने हाणून पाडला. बँकॉक येथून एक जण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर सीमा शुल्क विभागाने विमानतळावर सापळा रचला. अटक प्रवासी हा विमानतळावर आला. त्याच्या हालचाली या संशयास्पद वाटत असल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्याची तपासणी केली. त्याच्या बॅगेत परराष्ट्र मंत्रालयाची डिप्लोमॅटिक पाऊच (प्रवासाची बॅग) होती.

सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने त्या बॅगेची तपासणी केली. त्यात 14.738 किलो हायड्रोपोनिक गांजा होता. ती बॅग अधिकृत असलेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सील बंद टेपने बंद केली होती. तसेच त्या बॅगेत बनावट गुप्त मोहिमेच्या अहवालाच्या प्रतीदेखील होत्या. अटक प्रवाशाने गांजा नेण्यासाठी ट्रॉली बॅगचा वापर केला होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 14 कोटी 73 लाख रुपये इतकी आहे. गांजा तस्करी प्रकरणी त्या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली.