वडिलांचे सातवं लग्न रोखण्यासाठी मुलाने घेतली पोलिसात धाव, आझमगडमधील धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातून एक अत्यंत थक्क करणारी आणि तितकीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांच्या सातव्यांदा लग्न करण्याच्या हट्टामुळे त्रस्त झालेल्या एका अल्पवयीन मुलाने थेट पोलीस ठाणे गाठून न्यायाची मागणी केली आहे. 55 वर्षीय वडिलांच्या या “लग्नाच्या व्यसनामुळे” संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, आपल्या वडिलांना हे लग्न करण्यापासून रोखावे, अशी विनवणी या मुलाने पोलिसांकडे केली आहे.

ही घटना अहरौला पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात घडली आहे. बारावीत शिकणारा शनी नावाचा मुलगा सोमवारी पोलीस ठाण्यात रडत पोहोचला आणि त्याने आपल्या हतबलतेचा पाढा पोलिसांसमोर वाचला. शनीचे वडील अमरजीत मौर्य यांनी आतापर्यंत सहा लग्न केली आहेत. मात्र, एवढ्यावरच न थांबता ते आता सातव्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, या लग्नासाठी त्यांनी आपली उरलीसुरली मालमत्ताही पणाला लावली असून 50हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप शनीने केला आहे.

मुलाने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या या छंदापायी आणि मागील लग्नांच्या खर्चामुळे कुटुंबाची अर्ध्याहून अधिक शेतजमीन आधीच गहाण पडली आहे. वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी शनीला आपले शिक्षण अर्धवट सोडून मजुरी करण्यासाठी बाहेर पडावे लागले होते. तो आपल्या बोर्ड परीक्षेसाठी घरी परतला असता, वडिलांनी सातवे लग्न ठरवल्याचे त्याला समजले. यामुळे मुलाचे भविष्य अंधारात सापडले असून कुटुंबावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. गावप्रमुख शत्रुघ्न कनौजिया यांनीही अमरजीत मौर्य यांच्या या वागणुकीला दुजोरा दिला आहे. अमरजीत यांच्या अनेक पत्नी त्यांना सोडून गेल्या असल्या तरी त्यांच्या लग्नाचे सत्र थांबलेले नाही, ज्यामुळे संपूर्ण गावकरीही हैराण झाले आहेत. अहरौला पोलीस स्टेशनचे प्रमुख अमित कुमार मिश्रा यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून मुलाच्या तक्रारीनुसार तपास सुरू केला आहे. सध्या पोलीस वडील आणि मुलगा दोघांचीही चौकशी करत असून, मुलाचे भविष्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.