शहाड-आंबिवलीदरम्यान तपोवन एक्प्रेसमधील धक्कादायक घटना; मोबाईलचोराने फटका मारला; तरुण ट्रेनमधून पडला, इराणी गँगच्या हल्ल्यात गौरवचा पाय मोडला

तपोवन एक्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाला इराणी गँगमधील एकाने जोरदार फटका मारून खाली पाडले. धावत्या गाडीतून कोसळल्याने त्याचा पाय तुटला. रक्तबंबाळ अवस्थेत प्रवासी विव्हळत असतानाही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोबाईल आणि 20 हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. रविवारी सकाळी शहाड-आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान ही थरारक घटना घडली असून जखमी प्रवाशावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी काही तासांतच इराणी गँगमधील अल्पवयीन आरोपीला अटक केली
असली तरी प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

फटका गँगने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव गौरव निकम (26) असे आहे. तो नाशिकचा राहणारा असून काही कामानिमित्त ठाण्यात आला होता. येथील सर्व कामे आटोपून सकाळच्या तपोवन एक्प्रेसने नाशिकला जात होता. गौरव हा एक्प्रेसमधील दरवाज्याजवळ उभा होता. शहाड ते आंबिवलीदरम्यान गाडी येताच दबा धरून बसलेल्या इराणी टोळीतील एकाने फटका मारून त्याचा मोबाईल हिसकावला. मात्र अचानक मोठा झटका बसल्याने तो थेट रेल्वेतून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला.

फोटो दाखवताच हल्लेखोर सापडला

पोलिसांनी जखमी झालेल्या गौरवची विचारपूस करून त्याला धीर दिला तसेच काही संशयितांचे फोटोदेखील दाखवले. त्यातील एक फोटो पाहताच आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी तातडीने काही तासांतच इराणी वस्तीमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर यापूर्वीदेखील सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.

रक्तबंबाळ अवस्थेत असतानाही लाथाबुक्क्यांनी मारहाण

गौरव निकम हा रेल्वे रुळावर रक्तरंजित होऊन पडला असतानाही अल्पवयीन आरोपीने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर रोख रक्कम आणि मोबाईलदेखील हिसकावून पळ काढला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जखमी प्रवाशाला कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याची गंभीर परिस्थिती बघून त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इराणी गँगच्या या हल्ल्यात गौरवचा पाय तुटला असून त्याला इतर ठिकाणीही गंभीर जखमा झाल्या आहेत.