
‘रामदास’ बोट ते काल-परवाच्या तुळजाई बोट दुर्घटनेपर्यंत गेल्या ७५ वर्षांत कासा खडकाजवळ ८०० हून अधिक प्रवासी तसेच मच्छीमारांचा बळी गेला आहे. मृत्यूचा बर्म्युडा ट्रंगल बनलेल्या उरण, रेवस दरम्यानच्या या खडकावर दीपस्तंभ उभारावा यासाठी अनेक वर्षांपासून रायगड, मुंबईतील हजारो मच्छीमार आवाज उठवत आहेत. मात्र दीपस्तंभाची ही फाईलच केंद्र सरकारने दाबून ठेवल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर बीपीटी प्रशासन व जलवाहतूक मंत्रालयाला जाग येईल, असा सवाल मच्छीमारांनी केला आहे.
उरण-रेवस सागरी मार्गावरून दररोज करंजा, मुळेखंड, खोपटाखारपाडा, दिघोडे, केळवणे, रेवस, दादर इत्यादी भागातील ६५० हून अधिक मालवाहू जहाजे, बार्ज, प्रवासी तसेच हजारो मच्छीमार बोटींची अहोरात्र वाहतूक सुरू असते. त्यामुळे हा सागरी मार्ग महत्त्वाचा मानला जातो. याच मार्गावर असलेला कासा खडक या बोटींसाठी गेल्या शंभर वर्षांत कर्दनकाळ ठरल्याचे अनेक दुर्घटनांवरून सिद्ध झाले आहे. १७ जुलै १९४७ रोजी याच खडकाजवळ ‘रामदास’ बोट बुडून एकाच वेळी सातशेहून अधिक प्रवाशांना जलसमाधी मिळाली. त्यापूर्वीदेखील दोन बोटी बुडाल्या होत्या. गेल्या आठवड्यात ‘तुळजाई’ नावाची बोट बुडून तीन खलाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे या खडकावर दीपस्तंभ उभारण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र येथे दीपस्तंभ उभारावा यासाठी अनेकदा आवाज उठवतानाच लेखी निवेदनही देण्यात आले आहे, परंतु सरकार याकडे कानाडोळा करत असल्याने मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे.
मिंधे खासदार बारणेंनी पत्र दाबून ठेवले
मिंधे खासदार श्रीरंग बारणे यांना मच्छीमारांनी गेल्या वर्षी निवेदन देत कासा खडकावर दीपस्तंभ उभारण्याची मागणी केली होती. मात्र सात ते आठ महिन्यांपूर्वी दिलेले हे पत्र बारणेंनी चक्क मे २०२५ रोजी जलवाहतूक मंत्री सरबनंदा सोनवाल यांना दिले आहे. त्यामुळे हे पत्र बारणेंनी इतके महिने का दाबून ठेवले, असा सवाल मच्छीमारांनी केला आहे.
चार वर्षांपूर्वी बीपीटीने सोल रवर चालवणाऱ्या दीपस्तंभाची सोय करून तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र आता तो दीपस्तंभ लुप्त झाला आहे. यामुळे चॅनलमध्ये दोन्ही बाजूला दिशादर्शक बोर्ड व दीपस्तंभाची उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र बीपीटीकडून दुर्लक्षच केले जात आहे.
– रमेश नाखवा, संचालक वेस्ट कोस्ट पर्ससीन असोसिएशन.