
गुजरात गॅस पाइपलाइन कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही परवानगी न घेता सुस्थितीतील कुडूस – देवघर रस्ता खोदून गॅस पाइपलाइन टाकली. नियमबाह्य काम करण्यास नागरिकांनी विरोध केल्यानंतर अधिकाऱ्यांनी दादागिरी करून काम पूर्ण केले. मात्र काम झाल्यानंतर कंपनीने रस्त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे हा रस्ता खड्यात गेला असून अपघात वाढले आहेत. रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहतूककोंडीमुळे नागरिक बेजार झाले आहेत.
गुजरात गॅस पाइपलाइन कंपनीने वाडा तालुक्यात नियमबाह्य गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम केले. नागरिकांचा विरोध डावलून हे काम केले, परंतु लाइन टाकून झाल्यानंतर खोदलेला रस्ता पूर्ववत केला नाही. रस्त्याच्या साईडपट्ट्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. गॅस पाइप टाकण्यासाठी खोदलेल्या चरीत वाहने अडकत आहेत. दररोज या ठिकाणी वाहने अडकून वाहतूककोंडी होत आहे. आज सकाळी खदानीमधून खडी भरून आलेल्या दोन हायवा गाड्या चिंचघर गावाच्या कमानीजवळ खोदल `ल्या रस्त्यात अडकल्या. त्यामुळे दोन तास वाहतूक बंद झाली. गुजरात गॅ स कंपनीच्या बेजबाबदार कामाचा नागरिकांना व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नियमबाह्य पद्धतीने खोदकाम केलेल्या या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
फौजदारी गुन्हा दाखल करा !
कुडूस-देवघर हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. गॅस पाइपलाइन खोदाईमुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात वाढले असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. शिवाय वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. नियमबाह्य पद्धतीने खोदकाम करून रस्त्याची वाट लावणाऱ्या गुजरात गॅस पाइपलाइन कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे.