कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला ग्रहण लागले; भाजप प्रदेशाध्यक्षांची कबुली

महायुतीत काहीच आलबेल नसून नेत्यांमध्ये कायम खटके उडत आहेत. कल्याण-डोंबिवलीत तर मिंधे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उघड संघर्ष असतो. आता तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी मिंधे गटामुळे कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला ग्रहण लागल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. कल्याणमध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला लागलेले ‘ग्रहण’ दूर करण्यासाठी भाजपचा महापौर होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील अपुऱ्या विकासावर चिंता व्यक्त केली. कल्याण-डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासावरून त्यांनी सत्तेतील भागीदार असल `ल्या शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीकेची झोड उठवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत आणि लोकप्रतिनिधी पातळीवर विकासाचा बोजवारा उडाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असूनही नागरिक नागरी समस्यांमुळे त्रस्त आहेत. या गुदमरलेल्या परिस्थितीतून शहराची सुटका करायची असेल तर भाजपचाच महापौर हवा असे चव्हाण यांनी सांगितले.

सत्तेत असूनही जबाबदारी झटकली
मेळाव्यात त्यांनी नाव न घेता शिंदे गटावर टीका करत सत्तेत असूनही जबाबदारी झटकण्याच्या वृत्तीवर सवाल उपस्थित केला. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे भाजप-शिंदे गटात सुरू असलेले अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून आगामी पालिका निवडणुकीत महायुतीत मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.