हुपरीतील सराफांकडून 400 ग्रॅम सोने जप्त, पनवेल गुप्तधन फसवणूक प्रकरण

पनवेलमध्ये घडलेल्या गुप्तधन प्रकरणातील सुमारे 40 लाख रुपये किमतीचे 400 ग्रॅम सोने हुपरीतील सोने-चांदी सराफांकडून (व्यावसायिक) पनवेल पोलिसांनी जप्त केले आहे. संकेश्वरच्या तौफिक मुजावर (वय 45, रा. संकेश्वर सोलापूर, जि. बेळगाव) या भोंदूबाबाने हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली (मोरे मळा) येथील अझहर मुजावर व नागावमधील इसाक रनमल्ली या एजंटांच्या मदतीने हे सर्व सोने कमी किमतीत हुपरीतील सोने-चांदी व्यावसायिकांना विक्री केले होते, अशी माहिती पनवेलचे सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. घेवडेकर यांनी दिली.

सोने खरेदी केलेल्या हुपरीतील व्यावसायिकांची पनवेल पोलिसांकडून गेल्या चार दिवसांपासून चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंत या घटनेतील सुमारे 40 लाख रुपये किमतीचे 400 ग्रॅम सोने येथील व्यावसायिकांकडून पोलिसांनी जप्त केले आहे. या घटनेने हुपरी परिसरातील सोने-चांदी व्यवसायात खळबळ उडाली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक घेवडेकर म्हणाले, कर्नाटक सीमाभागातील संकेश्वर नजीकच्या सोलापूरमधील तौफिक मुजावर या भोंदूबाबाने पनवेलमधील एका कुटुंबाला शेतातून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी सलग चार दिवस नग्न पूजेसह विविध प्रकारचे विधी करून शेतात खड्डाही खणला होता. तरीही गुप्तधन मिळत नसल्याने भोंदूबाबाने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख 5 लाख रुपये एका विधीवेळी लाल कपडय़ात बांधून ठेवण्यास सांगितले होते. विधी पूर्ण होताच भोंदूबाबाने त्या कुटुंबाचे सुमारे 400 ग्रॅम सोने व रोख 5 लाख रुपयांचे ठेवण्यात आलेले गाठोडे घेऊन पलायन केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या कुटुंबातील नातेवाईक महिलेने हा प्रकार पनवेल पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला होता.

पनवेल पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत तौफिक मुजावर या भोंदूबाबाला पकडून त्याचा पर्दाफाश केला. भोंदूबाबाने सर्व सोने पट्टणकोडोलीतील अझहर मुजावर व नागावमधील इसाक रनमल्ली या एजंटांमार्फत येथील धनाढय़ सराफांना कमी किमतीत विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पनवेल पोलिसांनी हुपरी पोलिसांशी संपर्क करून येथील सराफांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते. पनवेल पोलिसांनी या सराफांकडून सुमारे 400 ग्रॅम सोने परत मिळविले आहे.