
राजधानी दिल्लीत चालू आठवडा मोठ्या राजकीय घडामोडींचा ठरणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या 6 ऑगस्टपासून दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. गुरुवार 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
चालू पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’सह विविध मुद्दय़ांवरून विरोधकांनी सरकारला जेरीस आणले आहे. त्यामुळे सरकार बॅकफूटवर असतानाच गुरुवारी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. राहुल गांधी हे या बैठकीचे निमंत्रक आहेत. त्यांच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
असा असेल दौरा
उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत दाखल होतील. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या 15 सफदरजंग लेन या निवासस्थानी सायंकाळी शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीला ते मार्गदर्शन करतील. गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर शिवसेनेच्या नव्या संसदीय पक्ष कार्यालयाला ते भेट देतील. इंडिया आघाडीची बैठक व स्नेहभोजनाला ते उपस्थित राहतील.
संसद भवनातील पक्ष कार्यालयाला भेट देणार
उद्धव ठाकरे हे 8 ऑगस्टपर्यंत दिल्लीत असतील. या दौऱ्यात ते संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या कार्यालयालाही भेट देणार आहेत. याशिवाय काँग्रेससह इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.