
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल इंग्लंड दौरा गाजवल्यानंतरही आता आयसीसीचे मासिक पुरस्कारही जिंकण्याच्या शर्यतीत पुढे आहे. आयसीसीने जुलै महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी गिलला नामांकन दिले असून या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वान मुल्डर आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचेही आव्हान असेल.
गिलने नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत उत्पृष्ट नेतृत्व करताना फलंदाजीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हिंदुस्थानी संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. गिलने मालिकेत 75.40 च्या सरासरीने आणि चार शतकांच्या जोरावर 754 धावा केल्या. यामध्ये एक द्विशतकही समाविष्ट आहे. 25 वर्षीय गिलने या मालिकेत सुनील गावसकरचा 732 धावांचा विक्रम मोडला. कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱया कर्णधारांच्या यादीत गिल हा सर डॉन ब्रॅडमन (810 धावा) यांच्यानंतर दुसऱया स्थानी पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात वान मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 367 धावांची खेळी केली. ब्रायन लाराने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध केलेल्या नाबाद 400 धावांच्या विक्रमाच्या जवळ तो पोहोचला होता. दोन सामन्यांत त्याने 265.50 च्या सरासरीने 531 धावा केल्या. मुल्डरने गोलंदाजीतही 15.28 च्या सरासरीने 7 बळी टिपले. ज्यात पहिल्या टेस्टमधील चार बळींचा समावेश आहे. बेन स्टोक्सने हिंदुस्थानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 50.20 च्या सरासरीने 251 धावा केल्या आणि 26.33 च्या सरासरीने 12 बळी टिपले. दडपणाच्या परिस्थितीत फलंदाजीत आणि गोलंदाजीत उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्याचेही कौतुक झाले.