
इस्रायली मंत्रिमंडळाने आज गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात असलेली गाझा सिटी ताब्यात घेण्याला मंजुरी दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. हा निर्णय घेण्यासाठी तब्बल 10 तास चर्चा झाली.
गाझातील सुमारे 75 टक्के भाग आधीच ताब्यात घेण्यात आल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. गाझा पट्टीतील 25 टक्के भाग अद्याप इस्रायली सैन्याच्या नियंत्रणाखाली आलेला नाही. यापूर्वी नेतन्याहू यांनी संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेतल्याचे म्हटले होते. परंतु त्यात गाझा शहराचा उल्लेख नव्हता. आता गाझा सिटी ताब्यात घेण्याला इस्रायली मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आणखी चिघळणार आहे.
युद्ध संपवण्यासाठी घातल्या 5 अटी
हमास पूर्णपणे निःशस्त्र करा, उर्वरित सर्व ओलिसांची सुटका करा, गाझातून लष्करी दलांनी माघार घ्यावी, गाझावर इस्रायलचे सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण नियंत्रण असेल. गाझात एक पर्यायी नागरी प्रशासन उभारावे. मात्र त्यावर हमास किंवा पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे नियंत्रण नसेल, अशा पाच अटी घालण्यात आल्या आहेत.
गाझाला हमासच्या दहशतीतून मुक्त करणार
गाझाला हमासच्या दहशतीतून मुक्त करणे हे इस्रायलचे उद्दिष्टय़ असल्याचे बेंजामीन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. येथील लोकांना स्वातंत्र्य देणे आणि नंतर प्रशासन एका जबाबदार अरब सत्तेकडे सोपवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे इस्रायलला कोणताही धोका नसेल तसेच गाझातील लोकांना चांगले जीवन जगता येईल, असे सांगतानाच गाझा माझ्याकडे ठेवण्याचा कोणताही हेतू नाही, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.