
निवडणूक आयोग माझ्याकडे शपथपत्र मागत आहे. मी संसदेत संविधानावर हात ठेवून शपथ घेतली आहे. आज जेव्हा देशातील लोक डेटाबद्दल प्रश्न विचारत आहेत, तेव्हा त्यांनी वेबसाइट बंद केली आहे. राजस्थान आणि बिहारमध्ये आयोगाने त्यांची वेबसाइट बंद केली; कारण त्यांना माहीत आहे, त्यांचे खोटे सर्वांसमोर येईल, असा हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्दय़ावरून आज पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगावर केला.
बंगळुरूमधील फ्रीडम पार्क येथे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मतदान हक्क रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आपलं संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार देतं; परंतु मतचोरी करून लोकशाही संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
गेल्या निवडणुकीत भाजप, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेत्यांनी संविधानावर हल्ला केला. कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभेत 6.50 लाख मते आहेत, पण त्यापैकी सुमारे एक लाख मते चोरीला गेली. चोरी पाच प्रकारे झाली, असा दावा राहुल गांधी यांनी आज पुन्हा केला.
हे प्रेझेंटेशन देशभरात दाखवायला हवे – शरद पवार
राहुल गांधी यांनी जे प्रेझेंटेशन दिले ते देशभरात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात दाखवले पाहिजे. देशात जे कुणी सशक्त लोकशाहीवर विश्वास ठेवतात त्यांनाही हे प्रेझेंटेशन द्यावे. म्हणजे खरे काय आणि खोटे काय हे लोकांसमोर येईल, असे नमूद करतानाच निवडणूक आयोग जर स्वायत्त संस्था असेल तर त्यांनी यावर उत्तर द्यायला हवे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.