पालिकेच्या दिरंगाईमुळे गणेश मंडळांमध्ये संभ्रम, खड्ड्यांच्या दंडाबाबत अद्याप सुधारित पत्रक नाही

गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे पडणाऱ्या खड्डय़ासाठी निश्चित करण्यात आलेला 15 हजारांचा दंड पालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आला असून आता केवळ दोन हजारांचाच दंड आकारण्यात येणार आहे. मात्र पालिकेकडून अद्याप याबाबत सुधारित पत्रक काढण्यात आलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळांमधील संभ्रम दूर करण्यासाठी सुधारित परिपत्रक काढावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक मंडळांपैकी तीन हजार मंडळे रस्त्याच्या बाजूला मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. यासाठी पालिकेकडून परवानगी घेताना मंडपामुळे खड्डे पडला तर योग्यरीत्या बुजवून दिला जाईल, असे हमीपत्रच द्यावे लागते. मात्र या वर्षी पालिकेने अचानक प्रतिखड्डा 15 हजार रुपये वसूल करण्याचे फर्मान काढले होते. त्यामुळे हा अवास्तव दंड कमी करण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समिताने केली होती. त्यानंतर राज्य सरकारने पूर्वीप्रमाणे दोन हजार रुपये ठेवण्याचे आदेश दिला होता, मात्र आठवडा उलटला तरी पालिकेकडून अद्याप याबाबत सुधारित पत्रक काढले नाही. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.