दिल्लीत डिनर डिप्लोमसी; मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिसली ‘इंडिया’ आघाडीच्या एकीची वज्रमूठ

मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी सोमवारी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. जवळपास 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चानंतर सायंकाळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या एकीची वज्रमूठ दिसली.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाचे फोटो काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या स्नेहभोजनाचे वर्णन काँग्रेसने जेवणापेक्षाही खास आणि इंडिया आघाडीच्या एकतेचे शक्तीशाली प्रतिपादन असे केले. तसेच संविधानाचे समर्थन करण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेली सामूदायिक वचनबद्धता, सौदार्ह, परस्पर आदत आणि अढळ संकल्प यातून दिसून आला, असेही काँग्रेसने म्हटले. या स्नेहभोजनाला इंडिया आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही प्रमुख नेत्यांशी चर्चाही केली.

मतचोरीचा आरोप आणि बिहारमधील निवडणूक याद्यांच्या फेरतपासणीत सुरू असलेल्या घोटाळ्या संदर्भात सोमवारी इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतरही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दणदणीत मोर्चा काढला.

दिल्लीतील मोर्चा झाल्यानंतर सायंकाळी खरगे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार जया बच्चन, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, खासदार पप्पू यादव यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

दरम्यान, डिनर डिप्लोमसीनंतर आप खासदार संजय सिंह यांनी एक्सवर आपली भूमिका मांडली. आम्ही एसआयआरच्या मुद्द्यावर एकत्र असून सर्व विरोधक एकजूट आहोत. दिल्लीसह देशभरातील निवडणुका घोटाळा करून जिंकल्याचा लोकांची धारणा असल्याचे ते म्हणाले.

बुलंद नारा! एक व्यक्ती, एक मत; मतचोरीविरोधात निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीचा दणदणीत मोर्चा