कल्याण-माळशेजदरम्यान थरकाप; मुरबाडजवळ धावत्या एसटीचे चाक निखळले, सुदैवाने प्रवासी बालबाल बचावले

कल्याणहून माळशेजमार्गे पुणे-शिवाजी नगरकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसचे पुढचे चाक निखळून पडल्याची धक्कादायक घटना मुरबाडजवळील मामणोली गावाजवळ घडली. चाक निखळून पडताच बस एका बाजूने कलंडली आणि आतले प्रवासी एकमेकांवर आदळले. चाल काने शिताफीने बसच्या वेगावर ताबा मिळवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

कल्याण-शिवाजीनगर ही बस सकाळी सवाआठच्या दरम्यान कल्याण डेपोतून निघाली. दोन दिवसांपूर्वी रक्षाबंधन आणि रविवार असल्याने सोमवारी पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची या बसमध्ये मोठी गर्दी झाली होती. ही बस माळशेजमार्गे जाण्यासाठी मुरबाड मार्गावरील गोवेली-मामणोलीदरम्यान आली असता चालकाच्या बाजूचे पुढचे चाक अचानक निखळले. त्यामुळे मोठा दणका बसून एसटी एका बाजूने कलंडली. बसमधील प्रवासी अक्षरशः एकमेकांच्या अंगावर फेकले गेले. चालकाने सतर्कतेने वेगावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना सुदैवाने टळली.

चाकातील बेअरिंग कोरडे पडले

या एसटी बसचे टायर आणि नटबोल्ट व्यवस्थित होते. परंतु बेअरिंग कोरडे पडल्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. सर्व प्रवासी सुखरूप असून दुसरी बस पाठवून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले, अशी माहिती कल्याण एसटी आगाराचे व्यवस्थापक एम.बी. भोये यांनी दिली.