
येरवडा परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौकात फ्लायओव्हरबरोबर ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रकल्प विभागाने घेतला आहे. या फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाची अंदाजित किंमत ११५ कोटी ७३ लाख रुपये आहे. या कामासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे येरवडा परिसरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
येरवडा येथील बिंदू माधव ठाकरे चौक हा शाहदवल बाबा दर्गाजवळ आहे. या चौकातून संगमवाडी, खडकी, बंडगार्डन पूल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीकडे डॉ. आंबेडकर चौकाकडून जाता येते. सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढते. संगमवाडी येथे खासगी बसस्थानक असल्याने येथून खासगी प्रवासी बसेसचा नियमित प्रवास सुरू असतो, ज्यामुळे चौकात सतत कोंडी होते.
हा फ्लायओव्हर खडकीहून बंडगार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर फ्लायओव्हर उभारला जाणार आहे. हा फ्लायओव्हर टू-वे असेल, ज्यामध्ये दोन्ही बाजूंना २-२ लेन वाहतुकीसाठी उपलब्ध राहतील. ९०० मीटर लांबी व १५.६० मीटर रुंदीच्या या फ्लायओव्हरमुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. तर, संगमवाडी बाजूने डॉ. आंबेडकर चौक व बंडगार्डनकडे जाणारा वाय आकाराचा ग्रेड सेपरेटर तयार केला जाणार आहे. हा वन-वे असेल. संगमवाडीहून डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणारा भाग ५५० मीटर लांबीचा तर बंडगार्डनकडे जाणारा भाग ४४० मीटर लांबीचा असेल. संगमवाडी बाजूचा ग्रेड सेपरेटर ९ मीटर रुंद व ३ लेनचा असेल, तर डॉ. आंबेडकर चौक व बंडगार्डनकडे जाणारा भाग ७.५ मीटर रुंद व २-२ लेनचा असेल.