पुणे जिल्ह्यात कचरा प्रकल्पासाठी सहा ठिकाणी जागांची मागणी; जिल्हा परिषदेचा ‘पीएमआरडीए’ला प्रस्ताव

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने नाणेकरवाडी, सोमाटणे, पिरंगुट, भुकूम, भूगाव आणि माण यांसारख्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ‘पीएमआरडीए’ला पाठविण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी हिंजवडी, माण, मारुंजी आणि चाकण औद्योगिक क्षेत्रांतील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागातही कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे बनले आहे. विशेषतः पुणे शहराला लागून असलेल्या गावांमध्ये ही समस्या अधिक तीव्रतेने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विविध ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढते शहरीकरण झालेल्या नाणेकरवाडी, सोमाटणे, पिरंगुट, भुकूम, भूगाव आणि माण यांसारख्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव ‘पीएमआरडीए’ला पाठविण्यात आला आहे. याशिवाय मारुंजी येथे शाळेसाठी जमीन देण्याबाबतही प्रस्ताव सादर करण्यात आला असून, जिल्हा परिषदेला या जागेचा आगाऊ ताबा मिळणार आहे. तसेच म्हाळुंगे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी गायरान जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

हिंजवडी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
जिल्हा परिषदेच्या माहितीनुसार, माण, हिंजवडी आणि मारुंजी या भागांमध्ये चार लाख घनमीटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याआधीच चार लाख घनमीटर क्षमतेचा एक प्रकल्प कार्यान्वित आहे. हा नवीन प्रकल्प ‘नमामि चंद्रभागा’ योजनेअंतर्गत पूर्ण केला जाईल आणि यासाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हिंजवडीतील भाजीमंडई पाडली
हिंजवडीमधील काही रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात. या सूचनांनुसार जिल्हा परिषद प्रशासनाने हिंजवडी भागातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून नाल्यावर अनधिकृतपणे बांधलेली भाजीमंडई नुकतीच पाडण्यात आली आहे.