‘मोदींच्या मित्राची’ हिंदुस्थानविरोधात खेळी? अमेरिका-चीन ‘टॅरिफ’ला ब्रेक; ९० दिवसांची वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकमेकांविषयी मैत्रीची भाषा कायम चर्चेचा विषय बनते. ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये मात्र चित्र बरेच बदलले आहे. डोनाल्ड ट्रम्प ‘माझे मित्र मोदी’ अशी साद घालतात मात्र त्याच वेळी हिंदुस्थानविषयी आपली भूमिका अधिक कठोर करतात. आता तर त्यांनी हिंदुस्थानवर ५० टक्के टॅरिफ लावला आहे. तेव्हा अमेरिकेवर टीका करणाऱ्या चीनकडे मोदी सरकार आशेने पाहू लागले. पण ‘मोदींच्या मित्राने पुन्हा फसवले आणि चीन वरील टॅरिफचा निर्णय 90 दिवसांसाठी पुढे ढकलला. त्यामुळे अमेरिकेची खरा मित्र कोण?’, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

अमेरिकेने चीनसोबतच्या टॅरिफ संदर्भात आणखी ९० दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील करयुद्ध किमान १० नोव्हेंबरपर्यंत टळणार आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही अमेरिकन वस्तूंवरील अतिरिक्त कर पुढील ९० दिवसांसाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले, ‘मी चीनवरील टॅरिफ स्थगिती आणखी ९० दिवसांसाठी लांबणीवर टाकण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. करारातील इतर सर्व बाबी तशाच राहतील’. चीननेही अमेरिकन उत्पादनांवर १०% कर कायम ठेवत, कर अडथळे दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

हा करार १२ ऑगस्टला संपणार होता. मात्र गेल्या महिन्यात स्टॉकहोममध्ये झालेल्या चर्चेनंतर मुदतवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. ही मुदत वाढवली नसती, तर अमेरिकेचा चीनी वस्तूंवरील टॅरिफ एप्रिलमधील उच्च स्तरावर परत गेला असता.

मे महिन्यात जिनिव्हामध्ये झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी ९० दिवसांसाठी बहुतांश कर स्थगित करण्याचे ठरवले होते.

उद्योगक्षेत्राला दिलासा, बाजारातील तणाव कमी होणार

या मुदतवाढीमुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला असून बाजारातील तणाव आणि अस्थिरता काही काळासाठी कमी होणार आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनी वस्तूंवरील कर १४५% पर्यंत वाढवले होते, ज्याला चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर निर्बंध लावून प्रत्युत्तर दिले होते. मे महिन्यातील तहानुसार अमेरिकेने चीनी वस्तूंवरील कर ३०% केला, तर चीनने अमेरिकन वस्तूंवरील कर १०% ठेवून दुर्मिळ खनिजांचे निर्यात व्यवहार पुन्हा सुरू केले.

आता या मुदतवाढीमुळे फेंटानिल तस्करीशी संबंधित कर आणि चीनच्या रशिया-इराण तेल खरेदीसारखे वादग्रस्त मुद्दे सोडवण्यासाठी दोन्ही देशांना थोडा अधिक वेळ मिळेल. ऑक्टोबरच्या अखेरीस ट्रम्प चीन दौऱ्यावर जाऊन अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करतील, अशीही शक्यता आहे.

एआय चिप विक्रीवर वाद कायम

प्रगत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चिप्सच्या विक्रीवर वाद कायम आहे. ट्रम्प यांनी निर्यात नियम ढिले केले असले, तरी एनव्हिडिया (Nvidia) आणि एएमडी (AMD) यांना चीनमध्ये विक्रीसाठी काही अटी मान्य कराव्या लागल्या आहेत.

दरम्यान, चीनमधील नियामकांनी एनव्हिडियाला त्यांच्या H20 चिप्समधील सुरक्षाविषयक त्रुटींवर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे.