निवडणूक आयोग लोकशाहीचा रखवालदार नव्हे तर चोराच्या भूमिकेत; संजय राऊत यांचा घणाघात

निवडणूक आयोग लोकशाहीचा रखवालदार नव्हे तर चोराच्या भूमिकेत शिरला असून विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. मंगळवारी सकाळी ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी दिल्लीत इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर काढलेल्या दणदणीत मोर्चावरही भाष्य केले.

संजय राऊत म्हणाले की, सोमवारी दिल्लीच्या रस्त्यावर संसदेतील 300 पेक्षा जास्त खासदारांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी केला. लोकशाहीच्या मंदिरामध्ये चोऱ्यामाऱ्या करून आलेले लोक आमच्या अवतीभोवती आहेत. त्या चोरांचे हस्तक म्हणून देशाचे निवडणूक आयोग काम करत आहे. 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि निवडणूक आयोगाच्या दिशेने निघाले तेव्हा दिल्ली पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले. धक्काबुक्की करण्यात आली. बॅरिकेट्स टाकण्यात आले. आम्ही दहशतवादी आहोत का? 300 खासदार निवडणूक आयोगासमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका मांडली असती तर निवडणूक आयोगाला हार्ट अटॅक आला असा का? निवडणूक आयोग कुणाला घाबरत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे लोकशाहीचे रखवालदार म्हणून पाहतो. निवडणूक आयोगाने नि:पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजे. टीएन शेषण यांच्या काळात ते होत होते. पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून चोर आहे. निवडणूक आयोग चोराच्या भूमिकेत शिरला असून चोरांच्या मदतीने विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक आयोगाने टीएन शेषण यांच्या कारकि‍र्दीचा अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी कशा प्रकारे पक्षांना आदर्श आचारसंहितेचे पालन करायला लावले याचा अभ्यास निवडणूक आयोगाने करावा.

नरेंद्र मोदी, अमित शहा अजरामर नाहीत. त्यांनाही सत्तेवरून आणि या जगातून कधीतरी जायचे आहे हे निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी समजून घेतले पाहिजे. लोकशाही टिकली तरच देश टिकेल. पण काल त्यांनी आम्हाला रस्त्यावर अटक केली. पोलीस स्थानकात नेऊन ताब्यात घेतले आणि आमच्या अटकेची कागदपत्र करायलाही उशीर केला. त्याच्यामुळे आम्ही संसदेत पोहोचू शकलो नाहीत. त्या काळात सत्ताधाऱ्यांनी सगळी बिलं मंजूर करून घेतली. म्हणजे सरकार किती कारस्थान करतंय हे दिसते, असेही राऊत यावेळी म्हणाले.

दिल्लीत डिनर डिप्लोमसी; मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिसली ‘इंडिया’ आघाडीच्या एकीची वज्रमूठ

देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी, अमित शहा हे सरळ मार्गाने सत्तेवर आलेले नाहीत. लांड्या-लबाड्या करून हे सत्तेवर आले आहेत. नितीन गडकरी यांच्या मतदार संघात साडे तीन लाख मतं वगळली जात असतील तर याचा अर्थ यांना गडकरी यांच्यासारख्या स्पष्टवादी, परखड नेत्याचा पराभव घडवून आणायचा होता. पण लोकांनी तसे घडू दिले नाही, असेही राऊत म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडे असणारे पुरावे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहेत. जे कुणी निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत ते या लोकशाहीविरुद्ध कृत्य करत आहेत. सध्याचा निवडणूक आयोग हा लोकशाहीचा हत्यारा आणि मारेकरी आहे. सध्याचा निवडणूक आयोग हा भाजपची शाखा आहे.. त्यांना जे आदेश येतील गृहमंत्र्यांकडून त्या पद्धतीने ते काम करणार. पण एक दिवस या निवडणूक आयोगाला जनता लोकशाहीच्या हत्येबद्दल फासावर लटकवेल.

महाराष्ट्रात जनआक्रोश! भ्रष्टाचाराविरुद्ध वणवा भडकला; फडणवीस चीफ मिनिस्टर नाहीत तर थीफ मिनिस्टर, उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला