
महानगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. नदी, महामार्ग, प्रमुख रस्ते, रेल्वे मार्ग, पूल न ओलांडता हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सरासरी 20 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असला, तरी काही ठिकाणी मात्र प्रभागाची लोकसंख्या 22 हजार 437 राहणार आहे. त्यामुळे या प्रभागात फिरताना उमेदवारांच्या नाकीनऊ येणार आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे प्रभागाचा हा आराखडा आज नगरविकास विभागाला सादर करणार आहेत.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यासाठी उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठित केली होती. या समितीने सुमारे दोन महिने काम करून प्रभागांचा आराखडा तयार केला आहे. दिलेल्या मुदतीत हा आराखडा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सादर करण्यात आला आहे.
2011च्या लोकसंख्येनुसार प्रत्येक प्रभागासाठी सरासरी 20 हजार लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. काही ठिकाणी मात्र ही संख्या कमी-अधिक राहणार आहे. सर्वाधिक 22 हजार 437 लोकसंख्या असलेले काही प्रभागदेखील राहतील. मनपा प्रशासनाने उत्तरेकडून आराखडय़ास सुरुवात केली. त्यात नदी (सीना), महामार्ग, प्रमुख रस्ते, रेल्वे मार्ग, पूल यांची सीमारेषा लक्षात घेण्यात आली आहे. असे असले तरी काही प्रभागांची काही प्रमाणात मोडतोड होणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांची अडचण होणार आहे. केडगाव, बोल्हेगाव, नागापूर तसेच सावेडीतील काही प्रभाग पूर्वीप्रमाणे भौगोलिकदृष्ट्या मोठे राहणार आहेत. त्यामुळे प्रचारासाठी व पुढे विकासकामे करताना नगरसेवकांच्या चांगलेच नाकीनऊ येणार आहे.
महापालिकेने प्रभागरचनेचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यांच्यामार्फत हा आराखडा नगरविकास विभागाकडे सादर होईल. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून 3 सप्टेंबरला अंतिम प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. – यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका
प्रभागरचनेचा आराखडा तयार करताना नदी, महामार्ग, प्रमुख रस्ते यांचा विचार करण्यात आलेला आहे. सरासरी 20 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. सर्वाधिक 22 हजार 437 लोकसंख्येचाही प्रभाग असेल. आराखडा तयार करताना भौगोलिक बाबींचाही विचार करण्यात आला आहे. – विजयकुमार मुंडे, उपायुक्त तथा समिती प्रमुख
3 सप्टेंबरची प्रतीक्षा
निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने माजी नगरसेवकांसह नव्याने मैदानात उतरणाऱ्या अनेक इच्छुकांनी आपला प्रभाग निश्चित करून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काहींचे पक्षप्रवेश होणार आहेत, तर काही पक्ष बदलणार आहेत. परंतु, या सर्व घडामोडींना अंतिम प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतरच वेग येणार आहे. 3 सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने राजकीय गणितं मांडली जाणार आहेत.
तीन लाख मतदार
2011 च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात आला असला, तरी विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीनुसार मनपा क्षेत्रात सुमारे 50 हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत दोन लाख 56 हजार 719 मतदार होते. त्यामुळे या निवडणुकीत तीन लाखांहून अधिक मतदार राहण्याची शक्यता आहे.