कोल्हापुरात ‘मविआ’चे ‘आत्मक्लेश’, मतचोरीप्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात प्रचंड संताप

निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा पर्दाफाश करून त्याचा जाब विचारण्यासाठी निवडणूक आयोग कार्यालयावर धडक देण्यापूर्वीच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह 300हून अधिक खासदारांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने ‘आत्मक्लेश’ आंदोलन करण्यात आले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती स्मारकस्थळी झालेल्या या आंदोलनात ‘निवडणूक आयोग जवाब दो…’, ‘दादागिरी नहीं चलेगी…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी निवडणूक आयोग कोणाचे बाहुले नसेल तर त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

निवडणूक आयोगाने उत्तरे द्यावीत

‘केंद्र सरकारला या देशात हुकूमशाही आणायची आहे. त्याचा अनुभवसुद्धा येत आहे. त्यात स्वायत्त म्हणवणारी निवडणूक यंत्रणा कोणाचे तरी बाहुले बनल्याने देशातील लोकशाही संपविण्यासाठी असे खटाटोप केले जात आहेत. निवडणुकीत मतचोरी झाल्याचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग त्यावर निःपक्षपातीपणे कारवाई करण्याऐवजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडेच शपथपत्र मागत आहे. यातून त्यांना कारवाई करायची नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग जर खरोखरच कोणाचे बाहुले नसेल तर त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत,’ अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केली.

‘निवडणुकीत ज्या शंका उपस्थित केल्या, त्याला उत्तर देण्याऐवजी केंद्र सरकार व निवडणूक आयोग मुद्दा भरकटवत आहे. जर यंत्रणा पारदर्शी असेल, तर ते उत्तर द्यायला का घाबरत आहेत?’ असा सवाल शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी केला. यावेळी कॉ. दिलीप पवार, चंद्रकांत यादव, सचिन चव्हाण, आर. के. पोवार, उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, भारती पोवार, रवि जाधव, संदीप देसाई, दगडू भास्कर, अनिल घाटगे आदी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.