पंढरपूर विकास आराखडा अभ्यास समिती तयार करा

शासन, वारकरी संप्रदाय व पंढरपूर नागरिक यांचा सर्वांच्या संमतीने विकास आराखडा तयार करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, पंढरपूर नागरिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचा एक प्रतिनिधी अशी ‘पंढरपूर विकास आराखडा अभ्यास समिती’ तयार करावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी व तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना करण्यात आली.

दरम्यान, या समितीच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर विकास आराखडय़ाची पुनर्मांडणी झाली तर सर्वांना समाधान होईल. पंढरपूर विकास करणे शक्य होईल. यासाठी सदर समितीचे तत्काळ गठण होणे आवश्यक आहे. या समितीद्वारेच या प्रश्नावर तोडगा निघू शकतो. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदन यावेळी देण्यात आले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे कॉरिडॉरसंदर्भात बाधित परिसरातील मठ, मंदिरांच्या विश्वस्तांशी आज चर्चा केली. यावेळी बाधितांकडून पंढरपूर विकास आराखडा अभ्यास समिती तयार करण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना सुखसुविधा देण्यासाठी पंढरपूर येथे कॉरिडॉर (विकास आराखडा) प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित आराखडय़ात अनेक त्रुटी असून, सदरचा प्रस्ताव वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी केलेल्या सूचना डावलून केला जात आहे. तसेच वारकऱ्यांचे प्रश्न वेगळे आणि उत्तरे वेगळी, असा दिसून येत आहे. यामध्ये अनावश्यक भूसंपादनदेखील दाखवण्यात आले आहे. यावरून मोठा वादंग सुरू आहे. वारकरी संप्रदायातील सर्वांनी मिळून एक चांगला भूवैकुंठ विकास आराखडा शासनास सादर केला होता, त्याचे काय झाले, याचे उत्तर शासनाकडून मिळाले नसल्याचे वारकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीत सांगितले.

यावेळी राणा महाराज वासकर, कबीर महाराज, नीलेश बडवे, गणेश लंके, दत्तात्रय कवठेकर, मदन महाराज हरिदास, गणेश बडवे महाराज, भागवत महाराज चवरे, सुधीर रानडे, कौस्तुभ गुंडेवार, महेश महाराज देहूकर आदी उपस्थित होते.