
कराड दक्षिण मतदारसंघातील कापील येथे विधानसभेला बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले असून, कापीलचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी पुरव्यांसह बोगस मतदार समोर आणले आहेत. गावात रहिवास नसलेल्या नऊ मतदारांनी मतदान केले आहे. एका महिला मतदाराने कोल्हापूरचा पत्ता असणाऱ्या आधार कार्डच्या पुराव्यावर कापील येथे मतदान केले आहे. काही मतदारांची नावे कापील व गोळेश्वर या दोन्ही ठिकाणच्या मतदारयाद्यांमध्ये आढळून आली आहेत. गोळेश्वरमध्ये 75 बोगस मतदारांची नावे आढळल्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यांसह सादर केली.
दरम्यान, बोगस मतदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, मतदार नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी गणेश पवार यांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर 14 ऑगस्टपासून कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदानावरून देशभर रान उठविले असताना कराड दक्षिण मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचे गणेश पवार यांनी उघडकीस आणले आहे.
गणेश पवार म्हणाले, प्रियांका श्रीकांत चव्हाण, रूथ मायकल काळे, स्वाती सुनील मोरे, शीतल सुरेश सावंत, किशोर जयवंत जाधव, सुरेश बबन मदने, मधुकर डिसले, सुनीता सुरेश जाधव, स्वाती हणमंत पाटील या व्यक्ती कापील गावच्या रहिवासी नसताना त्यांची नावे मतदारयादीमध्ये आली आहेत. या मतदारांनी यापूर्वी ग्रामपंचायत, लोकसभा अथवा अन्य निवडणुकांमध्ये मतदान केलेले नाही. विधानसभा निवडणुकीला त्यांची नावे अचानक मतदारयादीत आली आणि त्यांनी मतदान केले. गावात त्यांचे घर, जमीन नाही, ते गावचे रहिवासी नाहीत. अचानक हे मतदार आले कोठून? महसूलच्या अधिकाऱ्यांनी तसा पंचनामा केला असून, या मतदारांची नावे मतदारयादीत कशी समाविष्ट झाली? याबाबत काही ठोस पुरावे आढळून येत नसल्याने मंडल अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे.
याशिवाय विनोद मोहन कदम आणि शिवम मोहन कदम यांची नावे कापील व गोळेश्वर या दोन्ही गावांत आढळली आहेत. तृप्ती उमेश गुणे या महिला मतदाराचे नाव कोल्हापूरचा पत्ता असणाऱ्या आधार कार्डच्या आधारे कापील गावी नोंदविले गेले आहे. त्यांचाही गावात रहिवास नाही. तर, आधार कार्डवर पत्ताच नाही असे गोळेश्वर गावात 75 मतदार आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी करावी. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गणेश पवार यांनी केली आहे.
अनोळखी व्यक्ती कापीलचे मतदार!
गावात घर नाही, जमीन नाही, रेशन कार्ड नाही, शिवाय ते गावचे रहिवासी नाहीत, अशा नऊजणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे विधानसभेला मतदान केले आहे. त्यांची नावे कशाच्या अधारे मतदारयादीत नोंदली गेली? ती कोणी नोंदवली? बीएलओ, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची पडताळणी का केली नाही? असे प्रश्न गणेश पवार यांनी उपस्थित केले आहेत.