जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी, वाठार ग्रामपंचायतीसमोर 15 ऑगस्टपासून साखळी उपोषण 

वठार तर्फे वडगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळास साडेसात एकर जमीन दिल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी शासनाच्या या आदेशाची होळी केली. याप्रकरणी ग्रामपंचायतीसमोर 15 ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वठार तर्फे वडगावच्या गट नं. 113 ‘ब’मधील सुमारे 33 आर क्षेत्र मालकी हक्काने, तर क्रीडांगणासाठी सुमारे दोन हेक्टर 66 आर 30 वर्षे भाडेपट्ट्याने अशी सुमारे साडेसात एकर जमीन जिल्हाधिकारी यांनी अंबपच्या श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळास दिली आहे. गावच्या विकासपूर्ण उपक्रमासाठी ग्रामपंचायतीने मागणी केली असूनही ही जागा संस्थेला देण्यात आली. याविरोधात ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत मोर्चा काढून शासनाच्या या आदेशाची होळी केली. मोर्चाचे नेतृत्व सरपंच सचिन कांबळे, वारणा दूध संघांचे संचालक महेंद्र शिंदे, युवासेनेचे संदीप दबडे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे आदींनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी गावच्या विकासासाठी जमीन न ठेवता व्यावसायिक संस्थेला दिलेल्या जमिनीचा अन्यायकारक आदेश रद्द करावा. आदेश रद्द करून गट नं. 113 ‘ब’चे संपूर्ण क्षेत्र पुन्हा पूर्ववत गायरान घोषित करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावे. सर्व कागदपत्रांची कसून चौकशी करून अतिक्रमणधारक म्हणून नोंद असणऱ्या संस्थेवर, तसेच या प्रकरणास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तपास करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी उपसरपंच अश्विनी कुंभार, सदस्य सुहास पाटील, महेश कुंभार, सचिन कुंभार, रेश्मा शिंदे, रुखसाना नदाफ, नानासाहेब मस्के, राजहंस भूजिंगे, नाना कुंभार, शरद सांभारे, संतोष वाठारकर, अनिल दबडे, संदीप पाटील, मोहसीन पोवाळे, बी. एस. पाटील, अजय मस्के उपस्थित होते.

सर्वकाही कायदेशीर पद्धतीने झालेय – विजयसिंह माने

याबाबत बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘जिल्हाधिकारी यांनी शैक्षणिक संस्थेसाठी काही जमीन भाडेपट्टय़ाने व काही जमीन मालकीहक्काने दिली आहे. हे सर्व पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने झाले आहे. केवळ व्यक्तिगत आकसापोटी काहीजण हा प्रकार घडवून आणत आहेत. चुकीच्या पद्धतीचा व्यवहार असेल तर कायदेशीर मार्गाने जाण्यास आमची कोणतीही हरकत नाही,’ असेही ते म्हणाले.