देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला नपुंसक करत आहेत, संजय राऊत यांचा घणाघात

फडणवीस मराठी माणसाचे संस्कार आणि संस्कृती संपवताय अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला नपुंसक करत आहेत, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, महाराजांच्या महाराष्ट्राला मर्द मराठ्यांच्या राज्याला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केले आहे. मुंबई, पुण्यासारख्या डोंबिवली सारख्या शहरांमध्ये अनेक सोसाट्यांमध्ये प्रवेश दिलं जात नाही, घर दिलं जात नाही, यावर संघर्ष सुरूच आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पालिका फतवा काढते की मांस, मच्छी विक्रीवर बंदी आणते. 15 ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन आहे, लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. हा धार्मिक उत्सव नाहिये. हा शौर्याचा दिवस आहे. या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झाला आहे. आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे स्वातंत्र्य आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीसांमुळे मिळालेले नाहिये. या स्वातंत्र्यासाठी हिंसाचार झाला, रक्तपात झाला, लोकांनी तुरुंगवास झाला. त्यात भाजप किंवा मांस किंवा मच्छी न खाणारे विचारसरणीवाले ते कुठेच नव्हते. आणि तुमच्याकडे मागणी केली कुणी? की स्वातंत्र्यदिनी मांसाहर वर्ज्य. हे महाराष्ट्रात काय नवीन थोतांड आहे? आणि या थोतांडांचे जनक कोण आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

देवेंद्र फडणवीस म्हणतात की काँग्रेसच्या काळातला निर्णय आहे. काँग्रेसचे सोडा तुमचं सांगा. तुमच्या स्वप्नातही तुमच्या छातीवर काँग्रेस आणि आम्ही बसलो आहोत. तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते आणि त्यांचे मावळे वरण भात तुप खाऊन लढत होते का? ते मांसाहारच करत होते. बाजीराव पेशवेही मांसाहर करत होते. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरही मांसाहार करावाच लागतो ना. वरण, पोळी श्रीखंड, पुरी खाऊन युद्ध नाही करता येत. तुम्ही महाराष्ट्राला नामर्द आणि नपुंसक करत आहात. हे फतवे मागे घ्या देवेंद्र फडणवीस. तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती संपवताय. स्वातंत्र्यदिनी मांसाहार नाही नवीनच थोतांड तुम्ही नका खाऊ. बरं तुम्ही सगळे लपून खात आहात. मग लोकांवर ही बंदी का लादत आहात. प्रत्येक प्रकारची बंदी लादली जात आहे. हा देश आहे की बंदीशाळा, हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? हे बंदीराष्ट्र झालेलं आहे. या विरोधात सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल असे संजय राऊत म्हणाले.

शरद पवार मुख्यमंत्री होऊन किती काळ लोटला? शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी होते हे फडणवीसांना माहित आहे का? मनोहर जोशी मुख्यमंत्री होते 25-30 वर्षांपूर्वी त्याच्या आधी पवारसाहेब मुख्यमंत्री होते. तुम्ही कोणते अध्यादेश बाहेर काढत आहेत. तुमच्याकडे आता कुणी मागणी केली आहे का? शरद पवार मुख्यमंत्री मांस विक्रीवर बंदी आणतील तर मला आश्चर्य वाटेल. असं काहीही घडलेलं नाही. हे थोतांड आहे. 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही, हा विजयी दिवस आहे. पण भाजप प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देतंय. तुम्ही द्या श्रीखंड पुरी, पुरणपोळ्यांच्या पार्ट्या. जे सरकार कामाख्या देवीला रेडे कापून जन्माला आलं त्यातल्या काही लोकांनी रेड्यांचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय. फडणवीसांचं जे सरकार गुवाहाटीला रेडे, बदके, कोंबड्या कापून जन्माला आलंय त्या सरकारला मांस मच्छीचं तिटकारा वाटतोय याचे मला आश्चर्य वाटतंय. कामाख्या देवीला 65 रेडे कापले आणि कापणाऱ्याला त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो. तिथली ती परंपरा आहे. तिथे बदकं कापली जातात, आणि कापल्याला त्याचा प्रसाद म्हणून मांसाहार करावा लागतो. अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगत आहेत की स्वातंत्र्यदिनी शाकाहारी व्हा ही थोतांडशाही बंद करा असेही संजय राऊत म्हणाले.

काही लोक मतदान वाढवून घेण्यासाठी बारामतीत पोलिसांच्या गाडीतून, सरकारी यंत्रणा वापरून पैसे वाटतात, बँका रात्री दोन वाजेपर्यंत उघड्या ठेवतात. मग ती निवडणूक साखर कारखान्याची असो, लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो. आणि काही लोक अशा चर्चा करतात, लोकशाहीमध्ये सगळ्याच बकवास चर्चा आहेत. सगळ्यात जास्त बकवास हे बारामतीत सुरू आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.