शाकाहार करायचा की मांसाहार हे लोक ठरवतील, आदित्य ठाकरे यांचे मत

स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीवर कल्याण डोंबिवली महागनरपालिकेत बंदी आणली आहे. पण त्या दिवशी शाकाहार करायचा की मांसाहार हे लोक ठरवतील असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्य दिनी काय खायचं किंवा खायचं नाही, हे ठरवण्याचा हक्क आपल्याला आहे! कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना त्यात हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि असा हुकूम नागरिक मान्यही करणार नाहीत! नागरिकांवर शाकाहार लादण्याऐवजी शहरातील भयानक रस्ते आणि मोडकळीस आलेल्या नागरी सुविधांच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करावं. शाकाहारी खायचं की मांसाहारी हे लोक ठरवतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले.