
एका दिव्यांग तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून हे नराधम तरुणीचा पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या बलरामपूर भागात एक 21 वर्षांची तरुणी घरी जात होती. ही तरुणी मुकी आणि बहिरी होती. ती घरी जात असताना एका दुचाकीवर दोन तरुण आले आणि तिला जबरदस्तीने गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करत होते. तरुणीने आपली कशीबशी सुटका करून घेतली आणि तिथून पळ काढला. त्यानंतरही या नराधमांनी तिचा पाठलाग केला आणि तिला एका निर्जन ठिकाणी नेले. या दोन्ही नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि निघून गेले.
मुलगी घरी नाही आली म्हणून मुलीचे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर एका निर्जन ठिकाणी तरुणी आढळली. तिचे कपडे फाटलेले होते आणि तिची प्रकृती ढासळली होती.
पोलिसांनी पीडित तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि आरोपींचो शोध घेऊन त्यांना अटक केली.




























































