Vece Paes passed away – लियंडर पेसला पितृशोक; ऑलिम्पिक पदक विजेते व्हेस पेस यांचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

हिंदुस्थानचा स्टार टेनिस खेळाडू लियंडर पेस याचे वडील आणि ऑलिम्पिक पदक विजेते डॉ. व्हेस पेस यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ काळापासून पार्किन्सन या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

व्हेस पेस हिंदुस्थानचे माजी हॉकी खेळाडू आहेत. हिंदुस्थानच्या हॉकी संघामध्ये ते मिडफिल्डर म्हणून खेळायचे. 1972 मध्ये झालेल्या म्यूनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या हिंदुस्थानच्या हॉकी संघाचे ते सदस्य होते.

हॉकीसह त्यांनी फुटबॉल, क्रिकेट आणि रग्बी यासारख्या खेळांमध्येही हात आजमावला होता. 1996 ते 2002 पर्यंत हिंदुस्थानी रग्बी फुटबॉल युनियनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. आशियाई क्रीडा परिषद, बीसीसीआय आणि डेव्हीस कपसह अनेक क्रीडा संस्थांमध्ये त्यांनी वैद्यकीय सल्लागार म्हणूनही काम केले.

ऑलिम्पिक पदक जिंकणारी बाप-बेट्याची जोडी

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या बाप-बेट्यांच्या दुर्मिळ जोड्यांमध्ये व्हेस पेस आणि लियंडर पेस यांचा समावेश होतो. व्हेस पेस यांनी 1972 मध्ये हॉकी या सांघिक खेळात कांस्य पदक जिंकले, तर लियंडरने 1996 अटलांटा ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला टेनिसमध्ये कांस्य पदक जिंकून दिले.